Tuesday, 23 May 2023

रडतेस का ग आई तु

रडतेस का  आई तु


रडतेस का  आई तु

मोठी मुलगी आली विचारत

रडतेस का  आई तु

मोठी मुलगी आली विचारत

कुठे काय काही नाही

म्हणाले मी हसत हसत 


खोट बोलायच नसत तुच मला शिकवलं

आणि तुच मला खोट सांगतेस हे मी पकड़ल

रडतेस का  आई तुसांग मला बरं

सांगते मग ऐकअग आई होणे नसत सोपं


अग आई होणे नसत सोपंकाहीच समजत नाही

मी करते तस करायच की त्या aunty सारखं हेच उमजत नाही

घर म्हणजे इकड़े तिकड़े नुसताचं पसारा पसारा  

याच्यापेक्षा जास्त झालाय मनात विचारांचा कचरा


तुम्ही दोघींनी भरलेत आमच्या आयुष्यात कितीतरी रंग

तुमच्या करमती बघुन होतोय आम्ही रोज दंग

तुम्ही दोघी पर्या आवडतात गं मला खुप खुप

पण कधीतरी १० मिनिटे तरी बसत जा ना गं चुप


आता ऑफिस ला जायचे लागलेत वेध

कस होईल काय होईल हया tension मध्येचं जातोय वेळ

कशाला करते मग जॉब कोणी म्हणेल  हसत

पण इमोशन च्या हया जाळ्यात मी नाही फसत


स्त्री म्हणून नाही करायचा जॉब अस कोण म्हणतं

उलट स्त्री म्हणून काम करतांना तिला मल्टी टास्किंग जमतं


मी मानली हार तर तू कोणाला बघुन शिकशील

पुढ़े जाऊन तू सुद्धा हेच ऑप्शन निवडशील

जशी तुझ्यासाठी पाहतेय मी मोठमोठी स्वप्न

माझ्या आईनेही ह्या दिवसासाठी घेतलेत खुप सारे कष्ट 


आईपण  म्हणजे दुःखवेदनात्रासझोप नाही

पण आईपण  म्हणजेचं सुखआनंदस्वप्न आणि खुप काही

आता बोलना गं ठमे आता बोलत का नाही

काय बोलू आईबसं बरं आधी तूही


खुर्चीवर बसवून तिने दिले मला पाणी

ही कधी एवढी मोठी झाली कळलेचं नाही

माझ्यासमोर हाताची घडी घालून बसली

ही तर ऐकवणार मला अता बनून माझीचं आई



आईतू  खरतरं ऑफिसला बरी असतेस

घरी असली की तू मला खुप त्रास देतेस

सारख सारख हे खा ते खा करतेस

आणि वारंवर अभ्यासला बसवतेस


तू जशी आहे तशीच रहा,तेच करत जा आंटी सारख नको

माझी आई अशीच आवडते मला

दुसर्यांची काॅपी पेस्ट नको


बसली होती ना मी आत्ता १० मिनिटे मी चुप

आई तू रडु नकोस कारण मला आवाडते तू खुप

चल आपण फिरायला जाऊ गार्डन मध्ये मस्त

तु मला आइसक्रीम घेउन देदोघी करु फस्त

Friday, 19 February 2021

इवलेसे विश्व



इवल्यास्या त्या डोळ्यात किती मोठी स्वप्न आहेत
ढगांच्या पलीकडल्या बाप्पालाही ते शोधत आहेत

इवल्यास्या त्या ओठांमध्ये किती प्रश्न सामावले आहेत
हे काबरं ते काबरं मध्येचं जगण्याची गंमत शोधत आहे 

इवल्याश्या त्या हातांनी किती कामं सुरु असतात
दहा वेळा पसारा करून परत आवरत बसतात 

इवलेसे ते पाय घरभर नुसते पळत राहतात 
धडपड करत इकडे तिकडे पडून पुन्हा चढत राहतात

इवल्याशा त्या ह्रदयातून किती प्रेम देत राहतेस
छोट्याशा त्या मिठीतून लढायलाही बळ देतेस 

Thursday, 14 January 2021

समुद्र

तुझ्यासारखचं आहे माझं मन
थांग पत्ता नसलेलं
वाहत आलेलं सगळचं 
इथे साचुन ठेवलेलं

कधीतरी येते मग 
एक अशीचं भरती
मनामधलं पाणी मग
येतं डोळ्यावरती


कधीतरी दाटून येते 
एक अनाहूत ओहोटी
शब्द सारे येऊनही
दाटून राहता मुखी

समुद्रा तुझ्यासारखचं 
आहे रे माझं मन
कितीही खोल असलं
तरी उथळपणे खळखळणारं

Friday, 23 October 2020

बाप लेकीचं नातं

बाप लेकीचं नातं

त्या दोघांच नातं
एका सुरेल गाण्यासारखं....
तिच्या हास्यात
त्यांना सुर गवसल्यासारखं

त्या दोघांच नातं
चंद्र तार्यांसारखं....
त्यांच्या खेळांनी
सगळं आकाश व्यापून टाकल्यासारखं

त्या दोघांच नातं
ऊन आणि पावसासारखं...
सोबतीने भवती
इंन्द्रधनुष्य पसरवल्यासारखं


त्या दोघांच नातं
मंद वार्यासारखं....
अलगद गालावर
छानसं हसु उमटवणारं

त्या दोघांच नातं
आई मुली सारखचं....
जन्म न देताही
कायमची नाळ जोडल्यासारखं


Thursday, 1 October 2020

आठवणी

आकाशातला तो लुकलुकणारा तारा...
आईच्या कुशीत शिरून तासन तास पाहीलेला
हॉस्टेलच्या बाकावर बसून माझी गुपितं ऐकणारा
ऊन्हाळ्यातल्या गच्चीवरच्या गप्पांचा साक्षीदार होणारा
Twinkle बनून मुलीच्या डोळ्यात चमकणारा
आकाशातला तो लुकलुकणारा तारा...

ती हूरहूर दाटून आणणारी संध्याकाळ
वयात आल्याची साक्ष देणारी
उगाचं मनाला चटका लावून जाणारी
त्या बोटक्लबला बसून आठवणीत रमणारी
घरच्या ओढीने न थांबता धावणारी
ती हूरहूर दाटून आणणारी संध्याकाळ


ते पावसाळी वातावरण
शाळेच्या नवीन वह्यापुस्तकांच्या वासाचं
चहा सोबत आवडतं पुस्तक वाचण्याचं
Long Drive ला जोडीने जाण्याचं
इवल्याश्या हातात थेंब साठवण्याचं
ते पावसाळी वातावरण

आकाशातला तो लुकलुकणारा तारा
ती हूरहूर दाटून आणणारी संध्याकाळ
ते पावसाळी वातावरण
ती कडाडणारी वीज
ते ओळखीचं गाणं
तो पारीजातकाचा वास

आठवणींचा ठेवा असा एकाच धाग्यात गुंतलेला
एकाचं अर्थाला जणू अनेक अर्थ देणारा

Monday, 27 July 2020

लेबल्स

आपण जन्माला येतो ते कोरी पाटी घेऊन आणि मग जसे जसे वयाने वाढत जातो तसे त्या कोऱ्या पाटीवर अनेक गोष्टी कोरल्या जातात. कसे वागावे, कसे बोलावे, काय बोलावे, काय घालावे एक ना अनेक खुप गोष्टी त्या पाटीवर लिहिल्या जातात. आपण त्या सर्व गोष्टींना प्रमाण मानुन त्या नुसार आपला आनंद, दुःख, समाधान ह्या गोष्टी ठरवतो. आपल्या मनातील ही प्रमाणे म्हणजे आपण सर्व गोष्टींवर लावलेली Labels आहेत. चांगलं घर म्हणजे प्रगती, व्यवसाय म्हणजे risk अशी मोठ्या स्वरूपाची तर अमुक एक व्यक्ती चिडकी, गोरी व्यक्ती सुंदर, पुरुष म्हणजे हेकेखोर अशी वैयक्तित स्वरूपाची Labels लोकांना, परिस्थितीला लावून आपण जगत असतो. त्याच अनुषंगाने आपण लोकांशी वागतो. पण जर ही आपली लेबल्स चुकीची असली तर, मुळात त्या कोऱ्या पाटीवर लिहितांना चुकीचं लिहीलं गेलं असेल तर. तर जर तुमचा base च चुकला असेल तर आनंदी, समाधानी राहणं अशक्य आहे. 


    ह्या लेबल्स मुळेच आपण आपल्या कडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो हे लक्षात येईल. मी लहानपणापासूनच बारीक ह्या गटात मोडणारी, त्यामुळे साहजिकच नातेवाईक , मित्रमंडळी सतत हे खा ते खा सांगत असत. त्यावरून कोणी गंम्मत करणारे सुद्धा भेटले. पण मी ते गमतीत घेत नसे मला वाईट वाटायचे.कालांतराने(खूप वाचन आणि विचारविनिमय केल्यानंतर) मला जाणवले की 'मी बारीक आहे म्हणून मी सुंदर नाही आणि म्हणून मी आनंदी राहू शकत नाही आणि मी बारीक आहे म्हणून लोक मला बोलतात'  हे मी मला लावलेलं एक लेबल होत. खरंतर ह्या लेबल मुळे कोणी माझ्या चांगल्यासाठी काही सांगत असले तरी मी त्याची दखल न घेता वाईट वाटून घेण्यात वेळ व्यर्थ घालवला. ह्या लेबल मुळे मी स्वतःवर प्रेम करतच नव्हती तर ते इतरांनी करण्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. हे लेबल काढल्यावर माझा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढला आणि दुःख करण्याचं सोडून मी पुढे वाटचाल करू शकली.


अशी कितीतरी लेबल्स आपण सतत लावत असतो एखादा मित्र ऐकूनच घेत नाही, बायको आहे ती समजून घेणारचं नाही, माझा नवरा माझ्यावर प्रेमच करत नाही, ही तरुण पिढी खूप आगाऊ आहे, म्हातारे लोक थोडे हट्टीच आहेत आणि त्यानुसारच आपण त्यांच्याशी संवाद साधतो. आणि त्याचा परिणाम आधीच मनात ठरवलेला असतो. वर म्हणतो सुद्धा मला माहित होतं तू समजून घेणार नाही, मला माहित होतं तुझं प्रेमचं नाही. ते लेबल काढून एकदा बोलून बघा कदाचित परिणाम वेगळा होईल.


ह्याउपर आपल्या देशात/राज्यात/संस्कृती नुसार तर स्त्रियांच्या मनावर असंख्य लेबल्स लावली जातात; त्याग करणारी स्त्री महान, स्वयंपाक येणारी सूनचं छान, आपल्या आधी सगळ्यांचा विचार करणेच आपलं काम आहे, स्वतः रिलॅक्स न होणं, हे आणि ते कितीतरी लेबल्स स्त्रियांना लावले जातात. 'साईट जॉब' स्त्रियांकडून होणे शक्य नाही असा लेबल माझ्या मनावर होता.त्यामुळे सुरुवातीला मी स्वतःच 'मी एक स्त्री आहे म्हणून मी हे करू शकत नाही, मी एक स्त्री आहे मी तिकडे जाऊ शकत नाही, मी स्त्री आहे त्यामुळे हे बोलू शकत नाही ' अशी समजूत करून मीच स्वतःला अडवत राहिले. पण शोध घेतला असता मला जाणवलं की मी जर काम करायचं म्हणाली तर मला कोणी अडवणार आहे का (आजपर्यंत तरी काम करायला कोणत्या कंपनीने अडवले आहे असे ऐकण्यात नाही).कोणीही अडवणार नाही तर गाडी कुठे अडकली आहे तर ती अडकली होती मी पुढाकार घेण्यात. मी स्त्री आहे म्हणून मीच जर पुढाकार घेत नसेल तर इतरांनी मला अडवण्याचा प्रश्नच येत नाही. कारण इथे माझ्या प्रगतीच्या आड येणारी मीच आहे, मी मला लावलेलं लेबल आहे. एकदा हे मी लेबल काढलं आणि मला जाणवलं खरंतर परिस्थिती नाही मीच चुकीची होती. आणि एकदा तुम्ही हे लेबल झुगारले तर लोकांनी कितीही तुमच्यावर ते लादण्याचा प्रयत्न केला तरी त्याने तुमच्यावर त्याचा negative परिणाम होत नाही.


     ह्यासारखी अनेक लेबल्स आपण स्वतःच्या मनात धरून बसतो. त्यामुळे कधीतरी बसून आपल्या मनातले चुकीची प्रमाणे, चुकीची लेबल्स शोधणं गरजेचं आहे.चुकीची लेबल्स मुळे आपण स्वतःला victim समजायला लागतो आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या ऐवजी आपण परिस्थिती किंवा लोकांना दोष देत बसतो. त्यामुळे तुमच्या लेबल्स वर जरूर विचार करा, लिहून काढा आणि त्यांना बदलायचा प्रयत्न करा.आणि तुमच्या लेबल ला सकारात्मक बनवा. जसे की मी एक सुंदर व्यक्ती आहे, माझं सगळ्यांनावर आणि सगळ्यांच माझ्यावर खूप प्रेम आहे, माझं आयुष्य खूप छान आहे, संकट आली तरी त्यांच्या सोबत दोन हात करण्याची ताकद माझ्यात आहे. 


मी तर स्वतःला लेबल लावलंय की मी छान लिहिते त्यामुळे मी सारख लिहीत राहून तुम्हाला त्रास देणारचं आहे. 
माझा हा लेख तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.


धन्यवाद


योगिता रुपेश शेळके

Friday, 3 July 2020

लिहावंसं वाटतंय

आजकाल फक्त लिहावंसं वाटतंय
मनातलं कोणालातरी सांगावसं वाटतंय

असं नाहीये की कोणी बोलायला नाहीये
आजूबाजूला जिवलग आहेत आणि आहेत विचारणारे
तरीपण
आजकाल फक्त लिहावंसं वाटतंय
मनातलं कोणालातरी सांगावसं वाटतंय

खरं याचं कारण कळलंय मला
मला माझ्या भावनांना आवरणार नकोय
माझ्या बोलण्यातला चुका काढणारं नकोय
नकोय कोणी माझ्या विचारांना विचारणारं
नकोय कोणी भांडणारं, नकोय कोणी समजुन घेणारं

मला हवंय फक्त कोणीतरी माझं ऐकणारं
मी बोललेलं ऐकून माझं गुपित लपवणारं
आणि म्हणूनचं
आजकाल फक्त लिहावंसं वाटतंय
मनातलं कोणालातरी सांगावसं वाटतंय