माझ्या मुलीच्या जन्मानंतर झालेल्या हार्मोनल बदलामुळे मी डिप्रेशनमध्ये गेली होती , त्याउपर ती आठ महिन्याची झाल्यावर मला ऑफिस मध्ये रुजू व्हायचं असल्याने त्याचाही मनावर प्रचंड ताण होता. मी तशातच ऑफिस मध्ये रुजू झाले खरी; पण संध्याकाळी घरी येतांना खूप रडू यायचं, खूप वाईट वाटायचं कारण कळत नव्हतं. इतकं अस्वस्थ वाटायचं की जॉब सोडण्यापर्यंत विचार केला. त्यांतच काही खूप चांगल्या पुस्तकांचं वाचन केले , यु ट्यूब वरील काही व्हिडीओ पाहिले. ह्या सगळ्याचा खूप सकारात्मक परिणाम झाला. त्यातील एक महत्वाच पुस्तक म्हणजे हेल एण्रॉल्ड ह्याच 'द मिरकल मॉर्निंग' ह्या पुस्तकात मॉर्निंग रुटीन सेट कसे करावे आणि त्याचे फायदे हे सर्व नीट सांगितले आहे. मी त्या अनुषंगाने आणि इतर गोष्टींच्या सोबतीने माझं एक मॉर्निंग रुटीन सेट केलं आणि त्याचा मला प्रचंड फायदा झाला. माझ्या कामाच्या बाबतीतील उत्पादन क्षमता वाढली, घरातली चिडचिड कमी झाली, आयुष्याचा आनंद मी अधिक घ्यायला लागली. मलाच माझं आयुष्य अधिक सुंदर वाटू लागलं. त्यावेळी मी जे मॉर्निंग रुटीन सेट केलं ते कसं होतं हे मी पुढे सांगितले आहे.
सकाळी घरातील कामे किंवा इतर काही गोष्टी ज्यासाठी तुमचा एक वेळ असतो की त्यावेळी उठलं तरच सगळे काम व्यवस्थित होऊन आपण दिवस सुरू करू शकतो त्याला Threshold time म्हणूया. हि एक अशी वेळ आहे ज्या वेळेपेक्षा आपण ५ मिनिट जरी उशिरा उठलो तर आपली सकाळ सगळी पळापळी मध्ये आणि चिडचिड मध्ये जाते. तर ही जी वेळ आहे त्याच्या किमान एक तास आधी उठायचं आहे. त्यानंतर टप्प्या टप्प्याने खालील क्रम पाळायचा आहे.
१. प्रथम आपले प्रात:विधी उरकून एक ग्लास पाणी प्यावे.
२. १५ ते ३० मिनिट व्यायाम करावा
आपल्या शरीराच्या गरजेनुसार एखादा व्यायाम प्रकार करावा, योगासने करावी आणि सूर्यनमस्कार घालावे. त्यासाठी यु ट्यूब वर काही चॅनेल्स आहेत जे योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात, ते तुम्ही बघु शकता.
३. १५ मिनिट एका ठिकाणी शांत बसावे
शांत बसताना प्रथम एखादी प्रार्थना म्हणावी
" ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥"
ह्यासारखी सुंदर अर्थाची प्रार्थना कुठलीच नाही
त्यानंतर ध्यान करावे.
त्यानंतर स्वतःच्या मनावर स्वतः विषयीच्या चांगल्या गोष्टी सांगाव्यात. उदाहरण म्हणजे आपण खालील प्रमाणे म्हणू शकता
"मी एक चांगली व्यक्ती आहे, माझे कुटुंबियांचे माझ्यावर खूप प्रेम आहे, मी जो पाहू निर्णय घेईल तो विचार पूर्वकच घेईल, माझा माझ्या स्वतः वर , माझ्या कर्तृत्वावर प्रचंड विश्वास आहे, माझी प्रतिकार शक्ती खूप चांगली व मी खूप सुंदर व्यक्ती असून माझं स्वतः वर खूप प्रेम आहे"
त्यानंतरचा टप्पा म्हणजे Visualisation म्हणजे आपल्याला जे यश अपेक्षित आहे ते आपल्याला मिळाल्यानंतर होणाऱ्या प्रसंगाची बंद डोळ्यासमोर एक प्रतिमा निर्माण करणे . जसे की एखादया प्रोमोशन ची अपेक्षा करणार्ययाने आपण त्या खुर्चीवर बसलो आहोत आपले केबिन आहे अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करणे होय.
४. पुढचा टप्पा आहे दैनंदिनी लिहिणे व त्यासाठी वेळ १० मिनिटे.
ही दैनंदिनी दोन भागात लिहायचिये.
पहिला भाग आजच्या माझ्या दिवसासाठी मला कोणाला धन्यवाद म्हणायला आवडेल.ती एखादी व्यक्ती असू शकते, वस्तू असू शकते काहीही असु शकते. उदाहरणार्थ मला आज माझ्या झोपेला थँक्स म्हणायचं कारण छान झोपेमुळे मला आज खूप फ्रेश वाटतंय. त्या व्यक्तीच, वस्तूच इ. चे नाव करणासाहित त्या दैनंदिनी मध्ये लिहायचं.
दुसऱ्या भागात आजचा दिनक्रम लिहायाचाय, तो अगदी नुसते झोपणे जरी असेल तरी दिवस एका एका तासात विभागून त्यात आपण काय काम करणार आहे हा सर्व दिनक्रम त्यात मांडायचा. आज करायची महत्वाची कामे कोणती ते सुद्धा एका बाजूला लिहून ठेवा.
५. पाचवा आणि शेवटचा टप्पा , ह्यामध्ये एखाद्या पुस्तकाचे कमीत कमी १० पाने वाचायची आहेत.
हा आहे एक प्रकारचा सकाळचा परिपाठ जो मी माझ्यासाठी बनवला आहे. तुम्हीही ह्या पद्धतीने आपलं रोजचं सकाळचं अशा प्रकारे नियोजन केलत तर खरंच आयुष्य पूर्णतः जगण्याची अनुभूती मिळते. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यात तुमच्या आवडीप्रमाणे वेळेमध्ये बदल करू शकता, म्हणजे कोणाला अधिक वेळ व्यायाम करायला आवडतं, कोणाला अधिक वेळ पुस्तक वाचायला आवडतं.
तुम्ही हे नक्की करून बघा आणि आयुष्यात काही सकारात्मक बदल झाला तर मला नक्की कळवा.
धन्यवाद
योगिता
Khup chhan
ReplyDeleteTruly inspiring and motivational madam
ReplyDeleteVery Nice 👍👍
ReplyDeleteखूपच छान आमचाही प्रयत्न राहील हा दिनक्रम पाळण्याचा������
ReplyDeleteखूप छान मी प्रयन्त करते दिनक्रम पाळन्याचा
ReplyDelete