Wednesday, 25 March 2020

काय करावे

सद्यस्थितीतील सर्वांत गहन प्रश्न हा आहे की आता काय करावे, पुस्तक किती वाचणार, tv किती बघणार आणि गप्पा किती मारणार तर ह्या माझ्या लेखात काही गमतीदार गोष्टी ज्या आपल्याला घरी करता येतील त्या मी सांगते. म्हणजे कोरोना ने आपल्याला किंवा आपण त्याला हरवण्याची वाट बघण्यापेक्षा दुसरं कशात तरी आपलं डोकं घालता येईल.

नंबर १ - घरातील सगळे जुने फोटोज काढा आणि त्यातील आठवणी मध्ये रमून जा, आपले पोर बाळांना जुन्या गमती सांगा तसही सध्या ऐकण्यावाचून त्यांच्याकडे काही पर्याय उपलब्ध नाहीये.

नंबर २ - घराच्या घरी एखादी नाटीका बसावा किंवा एखादे आवडते पिक्चर चे सीन बसावा, गटागटाने आणि ते एकमेकांना करून दाखवा,त्याचं शुटींग करा आणि सोशल मीडियावर द्या टाकून. लोकांना पण तेवढंच नावं ठेवायला काहीतरी नवीन सापडेल. तेवढाच सगळ्यांच्या डोक्याला खुराक.

नंबर 3 - सगळे एकत्र बसून आपल्याला समोरच्याची आवडणारी एखादी गोष्ट , न आवडणारी एखादी सवय आणि एखादी नवीन सवय लावावी अशी अपेक्षा असेल तर ते प्रत्येकविषयी सांगावे. म्हणजे फुकटात फुकट सल्ले देता येतील आणि नवीन काहीतरी डोक्याला खुराक ही मिळेल

नंबर ४ - आपल्या बायको किंवा नवरा किंवा आवडत्या व्यक्तीला पत्र लिहा. त्यापेक्षा सगळ्यांनी एकमेकांना घरातच पत्र लिहा आणि द्या. आपण काळाच्या ओघात किती गोष्टी बोलायच्या राहिलात ते लक्षात येईल. आपल्या परिवाराला त्यांचं आपल्या आयुष्यात जे स्थान आहे त्याची जाणीव करून दया.

नंबर ५ - Thank you म्हणा. घरात किंवा फोनवर ज्या लोकांमुळे आज आपण घडलो त्या लोकांना कारणासहीत thank you म्हणा.

नंबर ६ - एक जर तर चा गेम आहे. सगळे दोन गटात वेगळे व्हा अर्ध्या लोकांनी जर असे झाले असते अशा अर्थाचे वाक्य लिहा आणि अर्ध्या लोकांनी तर असे झाले असते असे लिहा. दोन्ही चिठ्या दोन वेगळ्या ठिकाणी ठेवा आणि एकाने एक जर ची चिट्ठी उचला आणि दुसरयाने तर ची म्हणजे बनणारी वाक्य मजेशीर बनतील. उदाहरणार्थ एकदा आम्ही हा खेळ खेळत असताना माझ्या वडिलांनी चिट्ठी काढली 'जर मी पंतप्रधान झालो असतो' पुढची चिट्ठी आईने काढली 'तर मी सोन्याचा नेकलेस घेतला असता'

नंबर ७ - पूर्वीचे खेळ खेळा जसे की राजा राणी चोर शिपाई, चललस आठ, नाव गाव फळ फुल, पत्ते,लंगडी, लपाछपी, पकडा पकडी, भांडे भांडे भरपूर आहेत

नंबर ८ - घरात जी कुठलीही वस्तू कामातून गेली की टाका तिथे अशी जी खोली आहे, ती जरा आवरा सर्व वस्तू बाहेर काढा आणि नवीन जागा तयार करा

नंबर ९ - घराची साफसफाई करा. घरात काही बदल करा नवीन आपल्याला निवांत बसायला अशी जागा तयार करा . वस्तू जिथे वर्षानुवर्षे आहेत त्यानंही थोडा बदल द्या. घराला नवीन रूप द्या ते ही एकदम फुकट. बायको जर म्हणाली की इथे आपण नवीन सोफा आणला असता तर डायरेक्ट नाही म्हणू नका म्हणा 'आणला असता गं पण नेमकं दुकान बंद आहे , नाहीतर मी तुला कधी नाही म्हणतो का' म्हणजे खाण्याचीही सोय होईल.

नंबर १० - घरात दोघेच असाल तर date वर जा. दोघ नसाल तर पोरांना एका खोलीत डांबून date वर जा.म्हणजे टेबल सजवा घरचे पदार्थ हॉटेल सारखे मांडा, कॅडल पेटवा आणि एन्जॉय करा. पोरं गप्प बसत नसतील तर त्यांना वेटर बनवा.

नंबर ११- आणि जर तुम्ही घरात एकटेच असाल किंवा सगळे असून एकटीच मज्जा करायची असेल तर. तर मज्जा करा , डान्स करा , मोठमोठ्याने गाणी म्हणा, मोबाईल वर वेगवेगळी instruments आहेत ती डाउनलोड करून ती शिका. एखादा नवीन कोर्स करा त्यासाठी खूप साऱ्या वेबसाईट उपलब्ध आहे, self care साठी वेळ द्या एक तास आंघोळ करा , मस्त पैकी लोळा, पुस्तकं वाचा, विमान बनवा आणि उडवा.

नंबर १२ - आणि हो एक डायरी बनवा रोज सकाळी उठल्यावर आजचा दिवस आपल्याला ज्या गोष्टी मुळे चांगला वाटतोय त्या व्यक्ती किंवा वस्तूची नावे लिहा. त्यादिवशी चा दिनक्रम बनवा. आणि रात्री त्या दिवसाची रोजनिशी लिहा

ह्या काही कल्पना आहेत वेळेचा सदुपयोग करण्यासाठी,  वाटलं तर त्या अमलांत आणा. अजून काही कल्पना हव्या असतील तर मला मेसेज करा मी सांगेल पण प्लीज घराबाहेर पडू नका.

आणि हो सर्व एकाच दिवशी करू नका पुन्हा उरलेले दिवस प्रश्न पडेल , 'आता काय करावे'

No comments:

Post a Comment