Tuesday, 19 July 2016

शाळा भाग २-Smell of Rotten eggs

         


           आठवीला अ  तुकडीत आली. सेमी इंग्रजी मेडीयम , पूर्ण संस्क्रुत म्हणजे तेव्हा माझी गणती हुशार लोकांमध्ये व्हायला लागली म्हणजे आधीपासून मी होतीच हुशार पण तो भ्रमाचा भोपळा अ  तुकडीत येऊन फुटला.
          तर खूप हुशार (अति ??) लोकांचा तो वर्ग होता . प्रत्येक तासाला कोणाला काही प्रश्न असायचेच आणि शिक्षकांचेही आवडते विद्यार्थी ठरलेले असायचे. आमच्या वर्गात दोन विद्यार्थी हे शिक्षकांचेच मुले होती. आमच्या एक मॅडम तर फक्त त्या दोघांनाच शिकवत असत, बाकी विद्यार्थ्यांनी  काहीही केलं तरी त्यांचं त्यांना काहीही नसायचं. एक संस्कृत च्या मॅडम होत्या त्या तर एखाद्या सणाच्या दिवशी त्यांचा तास असेल तर , शिकवायचं सोडून आम्हाला मस्त त्या सणाविषयी माहिती सांगायच्या. त्यामुळे त्या वर्षात मॅडम जरी सण विसरल्या तरी आम्ही मात्र विसरायचो नाही आणि अगदी आठवणीने सणांची आठवण ठेवून मॅडम ला त्याची आठवण करून द्यायचो.
          ह्या संस्कृत मध्येच आम्ही एक कविता शिकलो होतो चिमणी वरची ' चटका चटका रे चटका , चिव चिव कुजसी तं विहंगा' ( चटका म्हणजे चिमणी बारा का, ज्यांचं संस्कृत नसेल त्यांना कळणार नाही म्हणून सांगितलं!!! तेवढीच थोडी हवा )  आजही चिमणी पहिली की तेच गाणं आठवतं. शाळेतल्या दिवसाच्या गमती ह्या अशाच मनावर कोरलेल्या आहेत. त्यातलीच एक गम्मत म्हणजे ' smell of rotten eggs '
           आमचा आठवीचा वर्ग हा प्रयोग शाळेच्या अगदी शेजारी होता . प्रयोग शाळेत जाणारे विद्यार्थी बरोबर दिसत ; तेवढाच एक विरुंगळा होता त्यामुळे फार आनंद झाला ; पण काही दिवसातच ह्या आनंदावर विरजण पडलं . एके दिवशी असाच दहावीच्या एक वर्गाने प्रयोग शाळेकडे प्रस्थान केलं. कोण कोणाला ढकलताय , पोरींच्या गप्पा हे सगळं बघण्यात मस्त २ मिनिट टाईमपास झाला; पण थोडा वेळ झाला आणि प्रयोग शाळेतून खूप दुर्गंध बाहेर येऊ लागला. अगदी शिक्षकांपासून ते मागच्या बाकावरच्या विद्यार्थ्याने नाकाला रुमाल लावला. त्यानंतर अस अनेक वेळा झालं , दहावीचा एखादा वर्ग प्रयोग शाळेत जायचा आणि मग प्रचंड दुर्गंध यायचा. कसले प्रयोग करत होते कळत  नव्हतं. एकदा मात्र सायंन्स  चा वर्ग चालू असतांना  वास आला तेव्हा आमच्या मॅडम ने आम्हाला सांगितलं (तोंडावर हात ठेवूनच हं )  की हा वास H२S ह्या गॅस चा आहे . H२S हा गॅस तयार झाला की एक दुर्गंध निर्माण होतो, हा वास rotten  eggs  सारखा असतो ( सेमी इंग्रजी चा फायदा असा होता की काही शब्द मराठीत कितीही वाईट वाटले तरी इंग्रजीत ते इतके वाईट वाटत नसत, जस की सडक्या अंड्यांचा वास हे किती वाईट वाटत, असाच एक आजार होता ज्याचं लक्षण ' Moonface ' अस होत पण तेच मराठी मध्ये 'चंद्रमुखी' म्हणून लिहावं लागायचं )
             अशा प्रकारे आम्ही आठवीत असतांना  , दहावीच्या एकूण ७ तुकड्या , प्रत्येकी ३ बॅचेस आणि काही परीक्षा यामुळे २५ ते ३० वेळा हा वास घेतला. आणि हा वास इतका लक्षात राहिला की दहावीला जेव्हा आम्ही हा गॅस चा प्रयोग केला आणि त्याचा वास आला तेव्हा इतका आनंद झाला की एखादा जुना मित्र खूप दिवसांनी भेटावा. प्रयॊग शाळेतून बाहेर पडतांना  मात्र मुद्दाम आठवीच्या वर्गाकडे पाहिलं , बिचारी पोरं अजूनही तोंडावर हात ठेवून बसली होती .
           पण ह्यावरून मला एकचं  वाटल  की," I have never smelled rotten eggs ; but I definitely know how rotten egg smells"


7 comments: