आठवी तशी अवघडंच जात होती ; कारण सेमी इंग्रजीचं पाहिलं वर्ष होतं . आयुष्यातले सगळ्यात कमी मार्क्स तेंव्हाच मिळाले म्हणजे तोपर्यंतच्या आयुष्यातले कारण त्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये आम्ही चांगलेच दिवे लावले. आठवीत पहिलं सत्र संपून दुसरं सत्र सुरू झालं ; तेव्हा खरी मजा सुरू झाली . शाळेमध्ये गॅदरिंग स्पोर्ट्स ह्या सगळ्याची फार धमाल आणि मजा चालू होती.
आमचं वर्गही तास चांगला चालू होता. सगळे तास मस्त व्हायचे फक्त एकचं तास असा होता ज्याला आम्हा मुलींना फार त्रास व्हायचा तो म्हणजे मधल्या सुट्टीचा. आमच्या वर्गातला एक मुलगा दरवाजालाच लटकायचा ; आम्ही बिचार्या पोरी बाहेर जायचं असेल तर त्याची खाली पडण्याची वाट बघायचो. काही मुलं वर्गातच पकडा पकडी खेळायची , तर काही कागदाच्या बोळ्याने मारामारी करायचे. मध्ये तर त्यांनी नवीनच गेम काढला होता कोणीही मुलगा खाली वाकला की त्याला सगळे धु धु धुवायचे. तर काही पोरं वर्गातच बॅट बॉल खेळायचे. तर एकदा ह्या महान लोकांचा बॉल आमच्यातल्या एका मुलीला लागला. आम्हीही संधीच सोनं करायचं ठरवलं आणि बॉल एकीच्या बॅगेत ठेवून दिला आणि पुढच्या तासाच्या मॅडम कडे तक्रार करायचं ठरवलं; पण आमचं दुर्भाग्य की पुढचा तास आंबाबाई मॅडम चा होता; अर्थात त्यांचं नाव वेगळं होतं पण त्या कपाळावर भलं मोठं कुंकू लावत म्हणून आम्ही त्यांना बहाल केलेली ही पदवी होती. दुर्भाग्य असं की ह्या मॅडम ना मुलांचा भयंकर पुळका होता ; पण तक्रार करायची ठरली म्हंटल्यावर आम्ही तक्रार केलीच. स्पोर्ट्स ची तयारी अशी करणे देऊन आधीच मुलांविषयी सॉफ्ट कॉर्नर असलेल्या मॅडम अजून सॉफ्ट झाल्या आणि मुलांकडून सॉरी न ऐकताच आम्हाला तो बॉल परत देऊन हार पत्करावी लागली.
ह्या गोष्टीचा काही मुलींना भयंकर राग आला. अशी छोटी मोठी भांडण तर वर्गात चालूच असायची. असाच एकदा खेळायचा तास होता . आम्ही सगळे मुले- मुली ग्राऊंडवर खेळायला गेलो. खेळून वर्गात आलो तर पाहतो तर काय वर्गात फळ्यावर मोठ्या अक्षरात ' मुलं बैल ' असं लिहिलं होतं. सगळीकडे कुजबुज सुरू झाली . कोणी लिहिलं; मग अर्थातच मुलींनी लिहिलं , बॉल लागला म्हणून मुद्दाम असं लिहिलं. मुलांनी पण आरडा ओरडा सुरू केला असा कसं लिहिलं , आम्ही तक्रार करणारं. हे चालू असतांना वर्गातल्या सगळ्यात खोडकर मुलाने वर्गात एन्ट्री केली आणि त्याने ज्या अविर्भावात प्रवेश केला आणि त्याच्या चेहऱ्यवरचे ते मिश्किल भाव ह्यावरून लगेच कळलं की ह्यानेच मधेच येऊन फळ्यावर असा लिहिलं ; पण आमच्याकडे काही पुरावाच नव्हता. हुशार मुलांनी पण तक्रार आंबाबाईकडेच केली त्यामुळे आम्हाला ओरडा खाऊन घ्यावा लागला आणि अशा प्रकारे आमच्यातला वाद अजून वाढला.
पण ह्या सगळ्याची एक वेगळीच मज्जा होती . ते दिवस अगदी मस्तीचे होते , तेव्हापासूनच समजूतदारपाने वागलो असतो तर आज कशावर हसलो असतो , तेव्हाच्या ह्या आठवणी नसत्या तर आज कशावर ' Nostalgic' झालो असतो.
ती भांडण फक्त गमतीची होती हे लक्षात आलंच कसं ते सांगेल लवकरचं ........
No comments:
Post a Comment