Saturday, 11 June 2016

आला पाऊस

आला तो ,

खरंच  किती छान वाटत तो आला कि ,

आणि खरच इतक्या आतुरतेने त्याची वाट बघण  किती योग्य आहे हे त्याने सिद्ध केल ,

पाऊस ,

आज आला पहिला पाऊस ,

सगळीकडे आता पावसावरच्या कवितांचा पाऊस  पडेल,

कोणी आपल्या पहिल्या पाऊस वरची आठवण लिहील तर कोणी पहिल्या पावसातल्या 'तिची' आठवण येऊन ते लिहील  ,

कोणी कुठे आपण पावसात अडकलो ते  सांगेल तर कोणी कुठे पावसात कोणाला बघून मन अडकलं  ते सांगेल ,

कोणी खूप भरभरून बोलेल पावसाबद्दल  तर कोणी चहाचा कप घेऊन त्याच्या वाफेसोबत खिडकीतून फक्त कोसळणाऱ्या पावसाला बघेल ,

कोणी एकटाच निघेल आपला डोंगरावर जायला तर कोणी निघेल आपल्या प्रेयसीला घेऊन नदीकाठी भिजायला ,

कोणी असेल एखादी अडकलेली पावसात चिंब भिजलेली घरात आता माती चिखल होईल ह्या विचाराने त्रस्त झालेली तर एखादी असेल मुक्तपणे गाडीवर फेरफटका मारायला निघालेली,

 कोणी असेल एखादी ती रंगबिरंगी छत्री घेऊन पोराला शाळेत लगबगीन सोडायला निघालेली तर कोणी कशाला तिचाच छोटा पोरगा असेल साचलेल्या डबक्यात उड्या  मारून तिच्यावर पाणी उडवणारा

खरतरं  हा पाऊस कोणासाठी पडतो ,
तो तिला पावसात गाडीवर जाता यावं  म्हणून पडतो कि ती मुद्दाम पावसात अडकावी म्हणून पडतो ,
का तो पडतो त्याला ती पावसात दिसावी म्हणून कि तो पडतो पावसातली ती त्याला आठवावी म्हणून ,

खरंच  तो असा प्रत्येकासाठी पडत असेल का ?
नाही ना
पण तरीही पटत नाही
अस वाटत पाऊस तर आत्ता आपल्यासाठीचं  पडतोय
आपल्याला भिजायचं नसेल तर अगदी आपण त्याला म्हणतो सुद्धा , ' प्लीज रे पावसा फक्त दहा मिनिट थांब मी एकदा ऑफिसला पोहचली कि मग तू खूप पड तुला हवा तेवढा '
म्हणजे म्हणून तर पाऊस  आपल्याला खूप जवळचा वाटतो कारण आपण त्याच्याशी असा बोलू शकतो कि तो आपल्याला जवळचा वाटतो म्हणून आपण त्याच्याशी बोलतो?
कुणास ठाऊक काय
पण पाऊस  म्हणजे प्रत्येकासाठी वेगळा अनुभव आणि
हो प्रत्येकवेळी वेगळा अनुभव …


हा पाऊस खूप आनंद घेऊन येवो हीच सदिच्छा











4 comments: