Saturday, 2 January 2016

कलावंतीन दुर्ग


               महाराष्ट्रातील सगळ्यात अवघड म्हणून ओळख असलेला दुर्ग म्हणजे कलावंतीन दुर्ग. आम्ही काही हौशी मंडळींनी तिथे दोन दिवसाची ट्रेक ठरवली. 
              पहिल्या दिवशी आम्ही दुपारी २.३० वाजता ठाणे येथून ट्रेक ला जाण्यासाठी सुरवात केली. दुपारी २.३० वाजता निघालेल्या ट्रेन ने आम्ही ३.३० वाजता पनवेल स्टेशनला पोहचलो . तिथून साधारण ५ मिनिट चालून जवळच असलेल्या पनवेल बस स्थानकावर आम्ही आलो. ह्या बस स्थानकावर ठाकूरवाडी हे गाव जे दुर्गच्या पायथ्याशी आहे तिथे जाण्यासाठी बस मिळते . दर एक तासाला ह्या बस असतात. ठाकूरवाडी गावात जाण्याआधी येणाऱ्या चौकात हि बस  उतरवते. हा बसचा प्रवास साधारण एक ते  दीड तासाचा आहे. ह्या बसच्या शेवटच्या टप्प्यातच आपण डोंगररांगांमध्ये प्रवेश करतो . आजूबाजूला छोटे मळे , दुरवर दिसणारे डोंगर , छोटासा रस्ता , जुनी घरे आणि होत आलेली संध्याकाळ त्यामुळे वातावरण अतिशय सुंदर वाटत होते.ह्या बसने उतरलं कि समोरचं  प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग दिसतात. 
            बसने जिथून उतरवलं  तिथून आम्ही ५ वाजता चालायला सुरवात केली . हा रस्ता पहिले कमी चढणाचा  आणि डांबरी असून पुढे तो कच्च्चा आणि अधिक चढणाचा  होत जातो. साधारण २.५ ते ३ किलोमीटर चालल्यावर आपण डोंगराच्या पायथ्याशी पोहचतो. ह्या टप्प्यापर्यंत टु  व्हीलर येऊ शकते मात्र ह्याच्यापुढे पायी चालण्याशिवाय पर्याय नाही . ह्या ठिकाणी पोहचल्यावर तिथे लिंबू सरबत , पाणी बॉटल तसेच बसण्यासाठी जागा ह्यांची सोय आहे. इथेच आम्ही थोडावेळ विश्रांती घेतली . तिथून साधारण एक ते दीड तास चाललं  की आपण प्रबळगड माची वर पोहचतो.हा रस्ता चढणाचा  आहे , कच्चा  आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी आहे तर काही ठिकाणी एका बाजूला दरी आणि एका बाजूला डोंगर असा आहे. काही शॉर्टकट चांगले आहेत.वातावरण थंड आणि मंद अशा सायंप्रकाशाचं  होत. मध्ये गप्पा मध्ये शांतता  , बाजूला गर्द दाट झाडी ह्यामुळे एकंदर चांगल वाटत असलं  तरी येणाऱ्या थकव्यामुळे हृदयातले वाढलेले ठोके स्पष्ट ऐकू येत होते.अशावेळी आपल्या मर्यादा कळतात एवढे मात्र नक्कीच; पण माचीवर पोहचलो तेव्हांचं  दृश्य पाहून सगळा थकवा दूर झाला.  माचीवर पोहोचण्याच्या थोडंस  आधी पुन्हा एक लिंबू सरबतसाठी आम्ही विश्रांती घेतली. अशा प्रकारे दोनदा विश्रांती घेऊन आणि मध्ये छोटे छोटे थांबे घेत आम्ही ७ वाजता माचीवर म्हणजे पठारावर पोहचलो. 
            पठारावरून दिसणारं  दृश्य खरंच  सुंदर होत. दुरवर पसरलेले डोंगर मध्ये खोल दरी . त्यातल्याच एका डोंगराला आग लागली होती ( किंवा कोणी लावली असावी ) ; पण त्या डोंगराजवळ केशरी रंगाच्या ज्वाला दुरूनही दिसत होत्या.आणि दुसर्या बाजूला मोकळ्या आकाशातून केशरी गोल जमिनीच्या पोटात शिरत होता. कुठेतरी वाचलं होत उगवत्याला सगळेच नमस्कार करतात पण मावळत्यालाही  आपण विसरलं नाही पाहिजे कारण जरी तो मावळतो ते परत उगवण्यासाठिच म्हणून त्या सूर्याला मनोमन नमस्कार केला.ह्या पठाराच्या एका बाजूला हि खोल दरी आहे तर दुसऱ्या बाजुला  कलावंतीन दुर्ग. संध्याकाळच्या प्रकाशात  कलावंतीन दुर्ग भव्य वाटत होता पण भीतीदायक नाही त्या उलट एक आश्वासकता वाटली त्या दुर्ग कडे पहुन. खंबीरपणे पाठीशी उभा होता.
             पठारावरच एक हॉटेल आहे जेवण व राहण्याची सोय आहे. त्यांच्याकडून पठारावर राहण्यासाठी आम्ही तंबू घेतले. आम्ही सर्वांनी गडावरच चुलीवर खिचडी करण्याचा बेत ठरवला होता त्याप्रमाणे आमच्यातील कोणी तांदूळ , कोणी तेल असेच इतर पदार्थ विभागून आणले होते. ठरवल्याप्रमाणेच आम्ही लाकडे गोळा करून चूल करून त्यावर मस्त पैकी खिचडी केली आणि फस्त पण केली .  त्यानंतर शेकोटीवर काही गप्पागोष्टी केल्या. एका बाजूला गाव असल्यामुळे तिथे असलेल्या स्ट्रीट लाईटमुले तारे दिसले नाही मात्र दुर्ग च्या बाजूला तारे दिसत होते. पठारावर छान शांतता होती. थंड वारा , मोकळे पसरलेले आकाश आणि त्यावर टिमटिमणारे तारे , भव्य असा दुर्ग,  सुख सुख म्हणता ते अजून काय असावं जेह्वा तुम्ही मनाला आवडेल तसं वागू शकता , मोकळ्या आकाशाखाली जमीनीवर लाज न वाटता अगदी बिनधास्तपाने कुठलही टेन्शन न  घेता झोपू शकता हेच आणि अशाचं छोट्या गोष्टींमध्ये तर सुख आहे.




            सकाळी आम्ही ७ वाजताच दुर्ग चढायला सुरवात केली . गावातून पुढे जाऊन डोंगर चढाताना आम्ही हरवलो . आम्ही हरवलेल्या रस्त्यावरच आम्हाला अजून एक हरवलेला व्यक्ती भेटला , असे हरवलेले आम्ही सगळे रस्ता  शोधत निघालो.गावातले लोकं  रस्ता दाखवण्यासाठी पुढेपर्यंत येतात आणि त्याचे ते १०० - १५० रुपये घेतात; पण आमचा रस्ता आम्हीच शोधण्याचं  ठरवलं . डोंगराच्या खडकातूनच पावसाळ्यात वाहणाऱ्या छोट्याश्या झर्याचा एक रस्ता होता , त्यामार्गाने आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशने चढलो आणि डोंगराच्या निम्म्या अंतरावर जिथे पायऱ्या सुरु होतात तिथे आम्ही पोहचलो.इथून पुढे गडावर जाण्यासाठी पायऱ्या  आहेत ; पण ह्या पायऱ्या  डोंगरात कोरलेल्या आहेत म्हणजे तुम्ही डोंगरावर चढतात आणि मागच्या बाजूला खोल दरी असते ; पावसाळ्यात ह्या पायऱ्यावर जाणे धोकादायक असू शकते. भीत भीत आणि सावकाश पाऊले टाकत आम्ही शेवटच्या टप्प्याला पोहचलो. इथून पुढे तुम्हाला दगडांवर पाय ठेवून चढणे आहे. साधारण ५ मीटरचा हा टप्पा चढला कि तुम्ही अवकाशात प्रवेश करतात म्हणजेच दुर्गच्या सगळ्यात उंच टोकावर. इथे आम्ही साधारण ८ वाजता पोहचलो. इथून तुम्हाला आजूबाजूला पसरलेले ढग दिसतील, पसरलेले डोंगर आणि काहीतरी मिळवल्याचा आनंद मिळेल. 
            इथुन खाली बघितल्यावर तुम्हाला तुम्ही पार केलेला पूर्ण रस्ता दिसतो कुठे सपाट रस्ता, कुठे अवघड वळण कुठे खोल दरी तर कुठे सहज चढण आणि तुम्ही हे सगळं पार करत इथे पोहचलेले असतात. तेव्हा वाटलं आयुष्य पण अजून वेगळ काय असत ना कधी खूप सुख असत , गोष्टी अगदी सहज मिळत जातात , तर कधी आपण दु:खाच्या खोल दरीत अडकतो आयुष्य संपेल अशी भीती वाटते, तर कधी आपण आलेले संकट अगदी सहजतने पार करतो ; पण ह्या सगळ्यात महत्वाचं  काय आहे तर चालत राहणे कुठेही सोडून न देणे. कारण आपण चालत राहिलो तरच पुढे जातो आणि मग मागे वळून पाहिलं तर पार केलेल्या अडथळ्यासाठी आपणच आपल्याला अजून मस्त वाटू लागतो आणि मग आपण आयुष्यात कुठलेही संकट पार करू शकतो हा विश्वास निर्माण होत जातो आणि आयुष्य अधिक सोप बनतं.  


बस मधून  उतरल्यावर  दिसणारा कलावंतीन दुर्ग 


कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड 

प्रबळमाचीवरून  दिसणारे गाव 



प्रबळ माचीवरून दिसणारा कलावंतीन दुर्ग 


आमची घरे 




कलावंतीन दुर्गवर  पोहचल्यावर दिसणारे अप्रतिम दृश्य 

फोटो क्रेडिट्स - तेजस शिंदे 

2 comments: