मनाच्या एका कोपऱ्यातून सुरु होणारा आणि मग कधी आईच्या मिठीतून प्रियकराच्या भेटीत, दहा वर्षांपूर्वीच्या अल्लडपणातून आयुष्याच्या अखेरच्या संध्याकाळ पर्यंत जाऊन येणारा विचारांचा प्रवास हा मला सगळ्यात जास्त आवडणारा प्रवास.
जेव्हा कधी मी प्रवासाला निघायचं ठरवते तेव्हा मी बऱ्याचदा प्रयत्न करते कि मी एकटीच असावी. एकटीने करायचा प्रवास हा मला जास्त अनुभवी आणि माझा वाटतो. माझ्या आणि मला खिडकीतून दिसणाऱ्या निसर्गाच्या, वेगवेगळ्या गावांच्या , लोकांच्या आड कुणी आलेलं मला आवडत नाही. माझी तंद्री आणि समाधी लागली कि शेजारी एखादा सुंदर तरुण जरी आला तरी माझी चलबिचल होत नाही.
माझी प्रवासयात्रा सुरु करण्याआधी जेव्हा मी standवर येते तेव्हा पासूनच माझे विचारचक्र सुरु होते.स्टेशन वर येणारे व्यक्ती त्यांना सोडायला येणारे त्यांच्या मनातील चलबिचल त्यामागचे त्यांचे विचार हे सगळचं बघतांना मानवी मनाचे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडतात.
आणि बस सुरु झाली कि बाहेरचं जग पाहत , एवढे लोक आजुबाजुला असतांना मिळणारा एकांत खरच विस्मयकारक आणि आनंददायक असतो . मग थोडस बस मध्ये डोकावलं कि सध्याचे ज्वलंत विषय काय , लोकांना आवडणारी गाणी कोणती इथपासून तर कोणाच्या घरातील भांडी फुटली आहेत आणि कोण कुठल्या जोशी काकु लग्नात किती भाव खात होत्या इथपर्यंतच्या सगळ्या बातम्या अगदी व्यवस्थित पोहचतात.
असा हा प्रवास मला खूप आवडतो ; पण त्यात मला जास्त आवडतं ते बसच्या वेगाने धावणारे माझे विचार. ते मला सांगतात मी काय आहे . ते मला शिकवतात मी काय केल पाहिजे. ते विचार मला माझंच प्रतिबिंब दाखवतात आणि नव्याने मी माझ्यावर प्रेम करू लागते प्रत्येक प्रवासात .... पुन्हा एकदा ....
No comments:
Post a Comment