'शाळा '. फक्त शाळा म्हटलं तरी आठवतात किती गमती , किती आठवणी आणि खूप गोष्टी . खरतरं ११ वी , १२ वी चा अभ्यास , त्यानंतर 'Engineering' चा अभ्यास(??) आणि मग नौकरी ह्या सगळ्यात शाळेच्या आठवणी गुडूप होऊन गेल्या होत्या ; पण आत्ताचं मिलिंद बोकील याचं ' शाळा ' हे पुस्तक वाचलं आणि शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या.
माझी शाळा खूप छान होती. मध्ये एक छोट ग्राउंड ; छोट म्हणजे एकाचवेळी आठवी, नववी, दहावीच्या प्रत्येकी ६ तुकडीचे मुलेमुली एका हाताचं अंतर सोडून मावतील इतकं मोठ ते ग्राउंड होत ; पण त्याच्याहीपेक्षा मोठा ग्राउंड शाळेच्या बाहेरच्या बाजूला असल्यामुळे हे छोट ग्राउंड. तर आमच्या ह्या छोट्या ग्राउंड च्या मधोमध एक मोठ लिम्बाच झाड होत , खूप जुनं आणि त्याभोवती एकदम छान असा पार होता. ग्राउंड वर दोन खो- खो चे पोलाही होते ; पण मधल्या सुट्टीत त्यावर खो - खो सोडून सगळे खेळ होत.
त्या ग्राउंडच्या भोवतीचं दोन मजली अशी आमची शाळेची इमारत होती. मोठे मोठे वर्ग , वर्गाबाहेर दरवाज्यावर इयत्ता व तुकडीच्या लाकडी पाट्या, वर्गात लाकडी बेंचेस, वर्गात एका बाजूला मुलांची रांग असायची आणि एका बाजूला मुलींची रांग आणि त्या रांगाच्या पुढे मधोमध शिक्षकांचा टेबल - खुर्ची.
ह्या शाळेत मी इयत्ता सहावीला असतांना प्रवेश घेतला , त्याआधी दर दोन वर्षाला माझी शाळा आणि माझ्या मैत्रिणी बदलल्या. सहावीनंतर मात्र मी ह्याचं शाळेत अगदी दहावीपर्यंत. सगळ्या इयत्ता पहिल्याच प्रयत्नात पास केल्यामुळे एकंदर चार वर्षाचा माझा आणि ह्या शाळेचा ऋणानुबंध .अरे हो!! माझ्या शाळेचं नाव C . D. O. MERI Highschool. Highschool सोडलं तर प्रत्येक अक्षराला longform आहे हे मला शाळा संपायला आल्यानंतर कळलं , तोपर्यंत मला वाटायचा कि CDO MERI म्हणजे सेंट मेरी वैगरे सारखी भानगड दिसतेय ; पण एकदा आमच्या शिक्षकांनी नारा द्यायला सांगितला 'CDO MERI मेरी है', त्यादिवशी घरी जाऊन आधी मी वडिलांना शाळेचं पूर्ण नाव विचारलं. ह्या शाळेज मी जरा उशिरा म्हणजे शाळेची पहिली term सुरु झाल्यानंतर आली , त्यामुळे ८२ % असून सुद्धा मला 'ड ' तुकडीत टाकण्यात आलं. त्यादिवशी मी रडत रडत घरी आले की मला ' अ ' तुकडीत जायचं असून पण मला 'ड ' तुकडीत टाकलं .माझ्या आई - वडील ,भाऊ - बहिण , शेजारी - पाजारी सगळ्यांनी माझी भरपूर समजुत काढली; पण शेवटी वर आमच्या पिताश्रींनी टोला मारलाच , ' अहो शाळेची लोक हुशार आहे ,पाहुणच कळाल असणार ' ढ ' मुलीला 'ड ' तुकडी नाही घालनार तर कुठे' आणि मग माझा भोंगा पुन्हा सुरु झाला. अखेर दुसर्या दिवशीचं आमच्या वर्गशिक्षिकेला काय वाटले कोणास ठाऊक ; पण मला वरच्या तुकडीत अर्थात ' क ' तुकडीत ढकलण्यात आले. सहावी तर फक्त एकमेकींची, शाळेची ओळख करण्यातच गेली . सातवी पासून मात्र शाळेची खरी गम्मत सुरु झाली. सातवीची एक गम्मत मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.
आमच्या शाळेत साधारण डिसेंबर - जानेवारी मध्ये ' क्रिडास्पर्धा ( स्पोर्ट्स) ' असायच्या. प्रत्येक इयत्तेसाठी एक गेम ठरलेला असत. तर आमच्या सातवी इयत्तेला त्या वर्षी कब्बडी हा गेम होता. माझं खेळातील कौशल्य म्हणा किंवा सगळ्यांशी असलेली मैत्री म्हणा पण त्यामुळे मला संघामध्ये प्रवेश मिळाला होता ; पण आमची अर्थात माझी शरीरयष्टी पाहता मी आणि इतरांनी ( खरतर इतरांनीच ) निर्णय घेतला कि मी राखीव गटात असावे. माझ्या सारखी कुशल खेळाडू सोडून आमच्या संघात ४ -५ धष्टपुष्ट आणि ४ -५ चपळ अशा मुली होत्या. ह्या जोरावर आमचा '७ वी क' संघ मजल दरमजल करत फायनल पर्यंत पोहचला; पण फायनल ला मात्र ' अ' तुकडी विरुद्ध हारला . हा पराभव आमच्या वर्गातल्या मुलींसाठी खूपच धक्कादायक होता कारण एकतर आपण फायनल ला हरलो आणि त्यातल्या त्यात आपण ' अ ' तुकडी विरुद्द्ध हरलो, हे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे आमच्या वर्गातल्या सर्व मुली पारावर बसून मोठमोठ्याने रडायला लागल्या ; त्या रडण्यापुढे गायीचा हंबरडा काय पण रेड्याचाही हंबरडा असता तर तोही ऐकू आला नसता. दगडालाही पाझर फुटावा अस त्याचं रडणं ऐकून मला मात्र इतके हसू फुटले कि काही सांगायलाच नको . एकीकडे माझ्या मैत्रिणी मोठ्याने रडताय आणि तिकडे मी कोपर्यात तोंड दाबून हसत होती. भले मला तिथून जाताही येत नव्हत कारण आधीचं मी आठवीला ' अ' तुकडीत जाणार म्हणून मला चिडवलं जात होत , त्यात मी निघून गेली असती तर मग आगीत तेल ओतल्या सारखंच झाल असतं. त्यादिवशी प्रथमच मी प्रसंगानुरूप वागायला शिकले म्हणजे माझे हसू थांबवण्याकरता मी हळूच मला चिमटे काढले पण त्या काढलेल्या चिमट्यानी नंतर माझ्याचं डोळ्यांत पाणी आले आणि मग माझ्या डोळयातले पाणी पाहून माझ्या मैत्रिणी अजून समाधानाने अर्थात अजून मोठ्याने रडायला लागल्या.
No comments:
Post a Comment