Thursday, 1 October 2020

आठवणी

आकाशातला तो लुकलुकणारा तारा...
आईच्या कुशीत शिरून तासन तास पाहीलेला
हॉस्टेलच्या बाकावर बसून माझी गुपितं ऐकणारा
ऊन्हाळ्यातल्या गच्चीवरच्या गप्पांचा साक्षीदार होणारा
Twinkle बनून मुलीच्या डोळ्यात चमकणारा
आकाशातला तो लुकलुकणारा तारा...

ती हूरहूर दाटून आणणारी संध्याकाळ
वयात आल्याची साक्ष देणारी
उगाचं मनाला चटका लावून जाणारी
त्या बोटक्लबला बसून आठवणीत रमणारी
घरच्या ओढीने न थांबता धावणारी
ती हूरहूर दाटून आणणारी संध्याकाळ


ते पावसाळी वातावरण
शाळेच्या नवीन वह्यापुस्तकांच्या वासाचं
चहा सोबत आवडतं पुस्तक वाचण्याचं
Long Drive ला जोडीने जाण्याचं
इवल्याश्या हातात थेंब साठवण्याचं
ते पावसाळी वातावरण

आकाशातला तो लुकलुकणारा तारा
ती हूरहूर दाटून आणणारी संध्याकाळ
ते पावसाळी वातावरण
ती कडाडणारी वीज
ते ओळखीचं गाणं
तो पारीजातकाचा वास

आठवणींचा ठेवा असा एकाच धाग्यात गुंतलेला
एकाचं अर्थाला जणू अनेक अर्थ देणारा

2 comments: