Monday, 27 July 2020

लेबल्स

आपण जन्माला येतो ते कोरी पाटी घेऊन आणि मग जसे जसे वयाने वाढत जातो तसे त्या कोऱ्या पाटीवर अनेक गोष्टी कोरल्या जातात. कसे वागावे, कसे बोलावे, काय बोलावे, काय घालावे एक ना अनेक खुप गोष्टी त्या पाटीवर लिहिल्या जातात. आपण त्या सर्व गोष्टींना प्रमाण मानुन त्या नुसार आपला आनंद, दुःख, समाधान ह्या गोष्टी ठरवतो. आपल्या मनातील ही प्रमाणे म्हणजे आपण सर्व गोष्टींवर लावलेली Labels आहेत. चांगलं घर म्हणजे प्रगती, व्यवसाय म्हणजे risk अशी मोठ्या स्वरूपाची तर अमुक एक व्यक्ती चिडकी, गोरी व्यक्ती सुंदर, पुरुष म्हणजे हेकेखोर अशी वैयक्तित स्वरूपाची Labels लोकांना, परिस्थितीला लावून आपण जगत असतो. त्याच अनुषंगाने आपण लोकांशी वागतो. पण जर ही आपली लेबल्स चुकीची असली तर, मुळात त्या कोऱ्या पाटीवर लिहितांना चुकीचं लिहीलं गेलं असेल तर. तर जर तुमचा base च चुकला असेल तर आनंदी, समाधानी राहणं अशक्य आहे. 


    ह्या लेबल्स मुळेच आपण आपल्या कडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो हे लक्षात येईल. मी लहानपणापासूनच बारीक ह्या गटात मोडणारी, त्यामुळे साहजिकच नातेवाईक , मित्रमंडळी सतत हे खा ते खा सांगत असत. त्यावरून कोणी गंम्मत करणारे सुद्धा भेटले. पण मी ते गमतीत घेत नसे मला वाईट वाटायचे.कालांतराने(खूप वाचन आणि विचारविनिमय केल्यानंतर) मला जाणवले की 'मी बारीक आहे म्हणून मी सुंदर नाही आणि म्हणून मी आनंदी राहू शकत नाही आणि मी बारीक आहे म्हणून लोक मला बोलतात'  हे मी मला लावलेलं एक लेबल होत. खरंतर ह्या लेबल मुळे कोणी माझ्या चांगल्यासाठी काही सांगत असले तरी मी त्याची दखल न घेता वाईट वाटून घेण्यात वेळ व्यर्थ घालवला. ह्या लेबल मुळे मी स्वतःवर प्रेम करतच नव्हती तर ते इतरांनी करण्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. हे लेबल काढल्यावर माझा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढला आणि दुःख करण्याचं सोडून मी पुढे वाटचाल करू शकली.


अशी कितीतरी लेबल्स आपण सतत लावत असतो एखादा मित्र ऐकूनच घेत नाही, बायको आहे ती समजून घेणारचं नाही, माझा नवरा माझ्यावर प्रेमच करत नाही, ही तरुण पिढी खूप आगाऊ आहे, म्हातारे लोक थोडे हट्टीच आहेत आणि त्यानुसारच आपण त्यांच्याशी संवाद साधतो. आणि त्याचा परिणाम आधीच मनात ठरवलेला असतो. वर म्हणतो सुद्धा मला माहित होतं तू समजून घेणार नाही, मला माहित होतं तुझं प्रेमचं नाही. ते लेबल काढून एकदा बोलून बघा कदाचित परिणाम वेगळा होईल.


ह्याउपर आपल्या देशात/राज्यात/संस्कृती नुसार तर स्त्रियांच्या मनावर असंख्य लेबल्स लावली जातात; त्याग करणारी स्त्री महान, स्वयंपाक येणारी सूनचं छान, आपल्या आधी सगळ्यांचा विचार करणेच आपलं काम आहे, स्वतः रिलॅक्स न होणं, हे आणि ते कितीतरी लेबल्स स्त्रियांना लावले जातात. 'साईट जॉब' स्त्रियांकडून होणे शक्य नाही असा लेबल माझ्या मनावर होता.त्यामुळे सुरुवातीला मी स्वतःच 'मी एक स्त्री आहे म्हणून मी हे करू शकत नाही, मी एक स्त्री आहे मी तिकडे जाऊ शकत नाही, मी स्त्री आहे त्यामुळे हे बोलू शकत नाही ' अशी समजूत करून मीच स्वतःला अडवत राहिले. पण शोध घेतला असता मला जाणवलं की मी जर काम करायचं म्हणाली तर मला कोणी अडवणार आहे का (आजपर्यंत तरी काम करायला कोणत्या कंपनीने अडवले आहे असे ऐकण्यात नाही).कोणीही अडवणार नाही तर गाडी कुठे अडकली आहे तर ती अडकली होती मी पुढाकार घेण्यात. मी स्त्री आहे म्हणून मीच जर पुढाकार घेत नसेल तर इतरांनी मला अडवण्याचा प्रश्नच येत नाही. कारण इथे माझ्या प्रगतीच्या आड येणारी मीच आहे, मी मला लावलेलं लेबल आहे. एकदा हे मी लेबल काढलं आणि मला जाणवलं खरंतर परिस्थिती नाही मीच चुकीची होती. आणि एकदा तुम्ही हे लेबल झुगारले तर लोकांनी कितीही तुमच्यावर ते लादण्याचा प्रयत्न केला तरी त्याने तुमच्यावर त्याचा negative परिणाम होत नाही.


     ह्यासारखी अनेक लेबल्स आपण स्वतःच्या मनात धरून बसतो. त्यामुळे कधीतरी बसून आपल्या मनातले चुकीची प्रमाणे, चुकीची लेबल्स शोधणं गरजेचं आहे.चुकीची लेबल्स मुळे आपण स्वतःला victim समजायला लागतो आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या ऐवजी आपण परिस्थिती किंवा लोकांना दोष देत बसतो. त्यामुळे तुमच्या लेबल्स वर जरूर विचार करा, लिहून काढा आणि त्यांना बदलायचा प्रयत्न करा.आणि तुमच्या लेबल ला सकारात्मक बनवा. जसे की मी एक सुंदर व्यक्ती आहे, माझं सगळ्यांनावर आणि सगळ्यांच माझ्यावर खूप प्रेम आहे, माझं आयुष्य खूप छान आहे, संकट आली तरी त्यांच्या सोबत दोन हात करण्याची ताकद माझ्यात आहे. 


मी तर स्वतःला लेबल लावलंय की मी छान लिहिते त्यामुळे मी सारख लिहीत राहून तुम्हाला त्रास देणारचं आहे. 
माझा हा लेख तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.


धन्यवाद


योगिता रुपेश शेळके

2 comments:

  1. साध्या सरळ भाषेत जीवनाचं मोठं गूढ उकलले तू योगी

    ReplyDelete
  2. मस्त.... छान

    ReplyDelete