Thursday, 4 February 2016

गाजराची पुंगी

              एक आटपाट नगर होत. अगदी रिकामं तिथे होती फक्त जमीन , नदी आणि वर मोकळ आकाश. एके दिवशी काय झाले अचानक मोठे वादळ आले, खूप पाऊस पडला , भुकंपही झाला. जेव्हा सर्व वातावरण निवळंले ह्या विचित्र परिस्थितीतून निर्माण झाले काही विचित्र प्राणी , त्यांना चालता येत होत, बोलता येत होत म्हणून त्यांना गोष्टीपुरता आपण माणुस  म्हणूया. ह्या वादळात निर्माण झालेल्या प्राण्यांना रंग होते , जे पाण्यातून निर्माण झाले ते गोऱ्या  रंगाचे  आणि जे जमिनीतून निर्माण झाले ते काळ्या मातीच्या रंगाचे. रंगांची हि उधळण निसर्गाने दिलेली हे मानून ते सर्व माणुस गुण्यागोविंदाने एकत्र राहू लागले.

            एके दिवशी काळ्या रंगाचे माणूस चर्चा करत होते, कि आपण मातीतून जन्माला आलो म्हणून आपल्याला हे गोरे मातीमोल ठरवता. आपण आपलं  वर्चस्व  वाढवायला हवं , अस काहीतरी करायला हव ज्यामुळे सर्व गोरे  आपल्याला मानतील , आपल्याशिवाय  याचं पानही हलणार नाही. त्यावर दुसरा म्हणाला , " अरे आपल्याला ह्या निसर्गाने बनवलं आपण त्यात काय बदल करणार ". त्यावर तिसरा म्हणाला , " त्याचाच आपण आधार घेऊया, आपण मातीमोल नाही आपण मातीतले म्हणजे वेगळे आपण तर खालच्या स्तरावरचे म्हणजे श्रेष्ठ , असं  आपण गोरे यांच्या मनात बिम्बवूया. आपण त्यांच्या मनात भीती निर्माण करू कि हि सृष्टी जमिनीतून निर्माण झालीये आणि आम्ही त्याचे खास बनवलेले पालनकर्ते आहे." 
अशा प्रकारे काळ्यांनी गोरे यांना सांगितले कि तुम्ही आमचं  पोषण केल पाहिजे मग आम्ही जमिनीला सांगू तुमचे पोषण करायला मग तुमचा नाश पण नाही होणार.

             गोऱ्यांच्या  मनात हि भीती राहिली मग ते अगदी प्रत्येक गोष्टीत काळ्यांची सेवा करु लागले , कुठल्याही शुभ , दुखद प्रसंगी काळ्यांना मान मिळाला , प्रत्येक वेळी त्यांना सोबत घेण्यात आले. काळ्यांचं  आयुष्यच बदललं मग त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीलाही तेच सांगितलं आपण फक्त ह्या गोऱ्यांना घाबरवत राहायचं , त्याचं अस्तित्व धोक्यात येईल जर त्यांनी आपल्याला मानल नाही हे त्यांना सांगत राहायचं तरंच  आपल्या कुळाचा उध्दार  होइल. आणि  असंच गोरे यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला सांगितलं कि आपण जर काळ्यांच ऐकलं  नाही तर आपला नाश होईल ते म्हणतील तसं  , ते म्हणतील तितकं  तुम्ही करत राहा आम्ही सांगतो म्हणून तुम्ही हे केलच पाहिजे. 
अशाप्रकारे आटपाट नगरमध्ये आता काळे म्हणतील तसे होऊ लागले . काळे म्हणतील हे खाऊ नये तर गोरे ते खात नसत  पण तिकडे काळे मात्र ते गुपचूप  खाऊन घेत असत कारण त्यांना माहित होते ह्याने काही सृष्टी संपत नाही. कधी कधी गोरे यांच्या मनात येई कि, ' अरे आपण सर्व काळ्यांच्या  सांगण्याप्रमाणे केल तरी सृष्टीचा विनाश होतोच आहे मग आपण त्याचं नाही ऐकल पाहिजे '; पण पुन्हा त्यांना वाटे नको आपल्याला नाहीतर पुढच्या पिढीला त्रास होईल अस काळे म्हणतात म्हणून आपण हे केलंच  पाहिजे '.
आणि मग वर्षानुवर्षे आटपाट नगरमध्ये तेच चालू राहिले भीती पोटी सुरु झालेल्या गोष्टी मग श्रद्धेच्या नावाखाली चालत राहिल्या . कोणी बदल करायचं  म्हंटल कि भीती दाखवण्यात आली, सृष्टीचा विनाश दाखवण्यात आला.
अजूनही आटपाट नगरमध्ये तेच चालूये आणि अजून कित्येक वर्ष ते चालूच राहील कारण मनात बसलेली भीती काढायला खूप कष्ट लागतात आणि बदलाचा वसा घायला वेळ लागतो . 

1 comment: